जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेने दि. ७ आगस्ट ते १७ सप्टेंबरपर्यंत किसान रेलच्या १२ फे-यांमध्ये एकूण ३,१६९ टन शेती उत्पादन व इतर पार्सलची वाहतूक झाली आहे.
रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेवर भारताची पहिली किसान रेल दि. ७ आगस्टपासून देवळाली ते दानापूर दरम्यान सुरु केली. या भागातील शेतक-यांना त्यांचे शेतीमाल देशाच्या दुर्गम भागात त्वरित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणा-या दरात पाठविण्यात मदत व्हावी यासाठी साप्ताहिक ट्रेन म्हणून सुरू केली.
या उपक्रमाला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नंतर ही गाडी मुझफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आणि मुख्य किसान रेल्वेला जोडण्यासाठी लिंक किसान रेल सांगोला / पुणे येथूनही सुरू झाली. किसान रेल आता दि. ८ सप्टेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. आतापर्यंत किसान रेलने १२ फे-या पूर्ण केल्या. ज्यामध्ये डाळिंब, शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फ-मासे आणि इतर पार्सल यासारख्या ३,१६९ टनाहून अधिक नाशवंत मालाचा समावेश आहे.
सोलापूर विभागातील सांगोला, मोडलिंब, बेलवंडी, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांवर पीओएस मशिन बसविण्यात येऊन किसान रेलमध्ये शेती उत्पादनांची बुकिंग करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्याचा सुलभ व त्वरित व्यवहारासाठी शेतकऱ्यांना फायदा होत आहे.