कारवाईचे अधिकार आता इंन्सिडंट कमाडंरला
जळगाव(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील कोविड या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-यांविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व इंन्सिडंट कमांडर यांना प्रदान करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
कोविड या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-या होलसेल, किरकोळ औषध विक्रेते, डॉक्टर्स, रुग्णालये व अन्य इतर संबंधित आस्थापना यांचेविरुध्द सापळा रचून अथवा अचानक धाडी टाकून सर्व इंन्सिडंट कमांडर व संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी औषधांचा काळाबाजार अथवा साठेबाजी होते अगर कसे, याची खात्री करावी. संबंधित ठिकाणी औषधाची साठेबाजी, काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याबाबतची सविस्तर माहिती सर्व इंन्सिडंट कमांडर व संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी औषधी निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांना तात्काळ द्यावी असे आदेशात म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्या वर नमूद केल्याप्रमाणे जर कोणी कोविडशी संबंधित औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर भा.द.वि. कलम 420 जीवनावश्यक वस्तू कायदा प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी तात्काळ करावी. जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी त्यांच्याकडून विकल्या जाणा-या प्रत्येक औषधींची लेखी पावती (बील) प्रत्येक ग्राहकास देणे बंधनकारक आहे. ग्राहकास जादा दराने औषधांची विक्री करण्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द देखील कारवाई होणार आहे.