पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेच्या मुलां व मुलींच्या शाळेतील पोषण आहार बनविण्याऱ्या महिलांना जवळपास एक वर्षापासून मानधन नसल्याने सदर महिला आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यांची दखल कुणीच घेत नसल्याने महिला हतबल झाल्या आहेत.
शासनाने प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुणी कुपोषणाचा बळी पडू नये व विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ व आरोग्य सदृढ रहावे, याकरिता पूर्वी वाटप होणारे तांदूळ बंदकरून शालेय पोषण आहाराची मध्यान्ह भोजन योजना अमलांत आणली गेली. या योजनेसाठी शासनाकडून तांदुळ, डाळी, तेल, मीठ व इतर जीवनाश्यक किराणा वस्तू पुरविल्या जातात. पण सदर महिलांना स्व- खर्चातून पोषण आहारासाठी आठवडाभराच्या मेनूसाठी रोज भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी रोजनिशी पदरमोडकरून पैसे मोजावे लागतात. अठरा वर्षांपासून या महिला प्रामाणिक पणे काम करीत आहेत. परंतु त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचा त्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला आहे. सदर महिलांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.








