मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या पोलीस विभागातील साडेबारा हजार रिक्त जागांच्या भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची घोषणा केली आहे तसेच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. त्यांच्यासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपासणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

अनिल देशमुख म्हणाले, “मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची देखील तपासणी केली जाईल. राज्य शासनाचा मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आहे.”
दुसरीकडे खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती हटत नाही तोपर्यंत राज्यात कोणतीही नोकर भरती करु नये अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे म्हणाले, “संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये.”
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागोपर्यंत राज्यात कोणतीही सरकारी नोकर भरती घेऊ नये, अशी मराठा समाजाची मागणी असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
नितेश राणे यांनी देखील पोलीस भरतीच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे. ‘पोलीस भरती घेऊन सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे‘, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर हल्ला चढवला. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर मेगा भरती काय मोठी भरती करावी, असंही ते म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यात सरकार वारंवार मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. ही स्थगिती सरकारने रद्द करावी आणि मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर मेगा भरती काय मोठी भरती करावी, सगळे स्वागतच करतील. जर जखमेवर मीठ चोळलं जात असेल तर विरोध होणारच.”







