मुंबई – सध्या सोशल मिडिया आणि स्थानिक न्यूज चॅनलवर सर्वाधिक चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना बॉलीवूड मधील सर्वात महागडी कलाकार असल्याचे समजते. कंगना ९६ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पंगा घेऊन चर्चेत आलेली कंगना सध्या मनाली येथे परतली आहे मात्र लवकरच तिला मुंबई येथे परतणे भाग पडणार आहे. याचे कारण म्हणजे लॉकडाऊन पूर्वी कंगनाचे तेजस, धाकड, थलाईवी आणि इमली असे चार चित्रपट सेट वर गेले आहेत आणि त्याचे शुटींग लवकरच पुन्हा सुरु होत आहे. या प्रत्येक चित्रपटाचे सरासरी बजेट ६० ते ७० कोटींचे आहे म्हणजेच कंगनावर सध्या २५० ते ३०० कोटींची गुंतवणूक झाली आहे.
कंगना रोज नवे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिली आहे. शिवसेनेची पंगा घेतल्यामुळे महाराष्ट्रात तिच्या चित्रपटांना विरोध होऊ शकतो असे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात कंगनाला पूर्वीपासूनच मोठे बॅनर तिला काम देणार नाहीत याची कल्पना होती म्हणूनच तिने स्वतःची निर्मिती कंपनी सुरु केली होती. कंगनाने प्रसिद्धीच्या फार झोतात नसलेल्या फिल्ममेकर बरोबर काम करण्यास नेहमीच प्राधान्य दिले होते आणि स्वतःच्या हिमतीवर ती बॉलीवूड मध्ये स्थिर झाली आहे.
कंगनाच्या मालकीचे मुंबई येथे तीन फ्लॅट, दोन कार, मनाली येथे एक बंगला आहे. कंगना एका चित्रपटासाठी १६ ते १७ कोटी मानधन घेते. धाकड आणि जयललिता यांच्या जीवनावर बनत असलेल्या थलाईवी साठी तिने २० ते २१ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. जाहिराती आणि ब्रांड प्रमोशन मधूनही ती चांगली कमाई करते. कंगनाने तिची पहिली कार बीएमडब्ल्यू ७ सिरीज वयाच्या २१ व्या वर्षी घेतली होती असेही समजते. मनाली येथील बंगला तिने १० कोटी मध्ये खरेदी केला आणि त्यानंतर त्याच्या दुरुस्ती साठी २० कोटी रुपये मोजले होते. या बंगल्यात ८ बेडरूम्स आहेत.