पिंपरी चिंचवड – कोरोनाच्या काळात अनेक लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात अनेक जण घरीच बसून आहेत, या काळात अनेक लोकं टी.व्ही किवा मोबाईलवर युट्यूब वर गाणे सिनेमा पाहून आपला वेळ घालवत आहेत. या दरम्यान यूट्यूबवर नोटा छापण्याचे व्हिडीओ पाहून घरीच एका बहीण-भावाने नोटा छापायला सुरुवात केली. नोटा छापणाऱ्या बहिण- भावाला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजी मंडईमध्ये खोट्या नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शंभर रुपयाच्या ३४ नोटा जप्त केल्या
दरम्यान भाऊ बहिण हे छापलेल्या खोट्या नोटा खपवण्यासाठी स्थानिक मार्केटमध्ये प्रयत्न करत होते. भोसरी येथील भाजी मंडईमध्ये या नोटा खपवण्याचा प्रयत्न करत होते. खोट्या नोटा खपवण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी सुनीता रॉय आणि दत्ता प्रदीप रॉय या भावंडांना अटक केली आहे. दोघांना अटक करुन त्यांच्याकडून शंभर रुपयाच्या ३४ नोटा जप्त केल्या आहेत.
दोघेजण यूट्युबवर व्हिडीओ पाहून घरातच खोट्या नोटा तयार करत
सुनीता रॉय आणि भाऊ दत्ता रॉय हे दोघेजण यूट्युबवर व्हिडीओ पाहून घरातच खोट्या नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केले होते. शंभर रुपये दराच्या बनावट नोटा छापण्याचा सपाटाच या दोघा भावा बहिणीने लावला होता. दोघांनी भाजी खरेदी करुन त्या नकली नोटा भाजी विक्रेत्याला दिल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भोसरी चौकीसमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये सुनीता आणि दत्ता नकली नोटा भाजी खरेदी करण्यासाठी वापरत होते.
एकूण ३४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनीता रॉय आणि भाऊ दत्ता रॉय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून, चौकशी केली असता पोलिसांनी शंभर रुपये दराच्या ३४ नोटा, दोन एचपी कंपनीचे प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण ३४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
हिंगोलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
हिंगोली जिल्ह्यात बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणारी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हिंगोली सारख्या अतिदुर्गम भागात असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला आहे. पोलिसांनी बनावट नोटांसह नोटा तयार करण्याचे साहित्य देखील जप्त केले आहे. बनावट नोटा तयार करण्याचे पाहून पोलिसांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. दरम्यान सदर कारवाई शहराच्या आनंद नगर भागात करण्यात आली आहे.
१७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नोटासह साहित्य जप्त
दरम्यान पोलिसांनी १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नोटांसह २० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा मशीन व इतर बनावटीचे साहित्य त्याची किंमत १७ हजार ९७५ रुपये, चार चाकी गाडी व प्रिंटर याची एकूण किंमत ६ लाख ४५ हजार रुपये असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.







