जबरी चोरी प्रकरणात मिळाली होती न्यायालयीन कोठडी
शिक्रापूर (पुणे) -शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी येरवडा तात्पुरते कारागृहात असताना पळाला आहे. हा आरोपी करोना पॉझिटिव्ह असल्याने खळबळ उडाली आहे.
अनिल विठ्ठल वेताळ (रा. गणेश नगर, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला असताना पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून या आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले होते. त्यामुळे त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. यापूर्वीही आरोपी अनिल वेताळ हा येरवडा कारागृहातून पळून गेला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला पकडून पुन्हा येरवडा कारागृहात हजर केले होते. दरम्यान कारागृहात आरोपींची तपासणी करण्यात आलेली असताना त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता.