वरणगाव (प्रतिनिधी) – फुलगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयातून प्रॅक्टकल आटोपून घराकडे परतणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला, भरधाव कारने धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ९.४० वाजता महामार्गावरील शिवाजीनगरसमोर घडली. या अपघातात १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित सुनील इंगळे (रा. डॉ.आंबेडकरनगर वरणगाव) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
रोहित हा आपल्या मित्रासह फुलगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयातून दुचाकीने (क्रमांक-एमएच.१९-डी.जी.६३३९) वरणगावकडे येत होता. शिवाजीनगरजवळ पाठीमागून येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच.१९-सी.व्ही.०९९०) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
चालक भरत हिरालाल परदेशी (वय ४१, रा. विटनेर, ता.भुसावळ, जि.जळगाव) कार चालवत होता. अपघातात दुचाकीवर मागे बसलेला रोहित रस्त्यावर पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सुनील रमेश इंगळे (वय ४७) यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातातील मृत रोहित मनमिळावू स्वभावाचा, हुशार आणि पालकांचा एकुलता एक होता. त्याचे इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण वरणगाव आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयात इंग्रजी माध्यमातून झाले होते. तो वरणगावातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान वर्गात शिकत होता. त्याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.