* भगवान सोनार *
जळगाव :- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या व दररोज वाढणारा आकडा आता प्रशासनासह सर्वांनाच विचार करायला लावतो आहे. गेल्या पंधरा दिवसांत रूग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला आहे. जिल्हा व शहराचे क्षेत्रफळ , लोकसंख्येची घनता लक्षात घेता रूग्णांची संख्या निश्चितच काळजी वाढवणारी आहे. लोकांची मानसिकता व प्रशासनाचे प्रयत्न सर्वांच्या समोर आहेत. त्यामुळे आता मुळापासून उपायांचा विचार करून सुधारणा कराव्या लागणार आहेत. शास्त्रशुध्द उपायांसह या उपायांमध्ये लोकसहभाग वाढवून व्यापक जनजागृतीची या जिल्ह्यात गरज आहे. आरोग्यखात्याकडील अपुरे मनुष्यबळ व सबळ नसलेली यंत्रणा हे दुखणे घेऊन प्रशासनाची तारांबळ पहिल्या दिवसांपासून सुरू आहे. आता हेवेदावे विसरून राजकीय नेत्यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी पुढे येऊन व प्रशासनालाही सहकार्य करून लोकप्रतिनिधी म्हणून पालकत्वाची भूमिका लोकांपुढे सांगावी , अशा सूचना पुढे येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांची जबाबदारी त्यामुळे वाढलेली आहे.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळातील वातावरणही कोरोना संकटाचा आधार घेऊन सत्ताधारी व विरोधक यांचा कलगीतुरा रंगला असल्याच्या चित्रामुळे ढवळून निघालेले आहे. त्यामुळे आपोआपच या जिल्ह्यातील परिस्थितीलाही राजकीय संदर्भ जोडून पाहिले जाऊ लागले आहे. सामान्य नागरिक आता उघडपणे व्यक्त होता येत नसले तरी मनोमन नाराज आहेत हे ही उघड आहे. या संकटाबद्दल राज्याला दिलासा देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या सुरूवातीलाच राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे, संकटाची ही घडी राजकारणाची नाही अशी भूमिका सगळ्यांना सांगितली होती. त्याची आठवण आता जिल्ह्यातील लोक स्थानिक नेत्यांना करून देऊ लागलेले आहेत. जिल्ह्यातले सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून ज्यांची जी जबाबदारी आहे त्यांनी ती पार पाडावी , अपल्याला काय त्याचे ?, ही भूमिका स्थानिक विरोधी नेत्यांनी आता तरी सोडून द्यावी . त्याचप्रमाणे सत्तेचा व राजकीय धोरणांचा अहंकार बाजुला ठेऊन सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांनीही विरोधकांना पक्षीय अभिनिवेश बाजुला ठेऊन सोबत घ्यावे , अशा सूचना सामान्यांमधून पुढे यायला लागल्या आहेत. राजकीय बळ सर्वांनी मिळून प्रशासनाला देऊन सांघिक भावनेने काम व उपायांची आखणी केली तर ते चित्र पाहून सामान्य लोकांना दिलासा मिळेल. हा सल्ला जिल्ह्यातील तमाम राजकारण्यांना दिला जातो आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय प्राबल्य पाहून लोक त्यांच्याकडे आशेने पाहात आहेत. हे दोघेही प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रीय आहेत. प्रशासकीय खाचाखोचांचा त्यांना चांगला अनुभव आहे.त्यांचा दांडगा लोकसंग्रह त्यांना प्रशासनाला सक्रीय करण्यासाठी वापरता येईल. राजकीय विरोधक असलेले नेते एकत्र काम करताना पाहून त्यांचे समर्थकही हेवेदावे विसरून आपआपल्या भागातील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करतील. या सगळ्या घडामोडी खरे तर लॉकडाऊनच्या सुरूवातीपासन प्रत्यक्ष घडायला पाहीजे होत्या मात्र राजकीय आघाडीवरचे चित्र या जिल्ह्यात समाधानकारक नाही हे सगळेच मान्य करतील.
या आजारात लोकांना शास्त्रशुध्द माहिती दिली जाणे, विनाकारण वाढवले जाणारे गैरसमज रोखणे , लोकांच्या स्वयंशिस्तीला विधायक वळण लावणे , पुरेशा वैद्यकीय सुविधा दिल्या जाणे, लोक घाबरणार नाहीत म्हणून लोकसंवादात सातत्य राखणे या बाबी व्यापक लोकसंपर्काशिवाय शक्य नाही, हा व्यापक लोकसंपर्क प्रशासनाकडून त्यांच्यावरील तांत्रिक व नियमांच्या चौकटींच्या बंधनांमुळे शक्य दिसत नाही म्हणून लोकसंपर्कासाठी व लोकसंवादासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकीय नेत्याच्या या यादीत सर्वपक्षीय स्थानिक आमदार, माजी मंत्री एकनाथराव खडसे , माजी मंत्री गुलाबराव देवकर , संजय सावकारे, रवींद्रभय्या पाटील , शिरीष चौधरी यांच्याही लोकसंग्रहाकडे व जनसामान्यांमधील त्यांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.