न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेतील करोना प्रसाराचे मुख्य केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क शहरातील लॉकडाऊन येत्या 8 जून पासून उठणार असून त्या दिवसापासून हे शहर खुले करण्याची प्रकिया सुरू केली जाणार आहे अशी माहिती त्या प्रांताचे गव्हर्नर ऍन्ड्रयु कुओमो यांनी दिली आहे. न्यूयॉर्क शहरात करोनाच्या सुमारे दोन लाख केसेस आढळून आल्या असून त्या शहरात करोनामुळे तब्बल 20 हजाराहून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. एखाद्या शहरात करोनाने इतके मोठे नुकसान झाल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे.
त्यामुळे मार्च महिन्याच्या मध्यापासूनच न्यूयॉर्क शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. न्युयॉर्क प्रांत मे महिन्यातच खुला करण्यात आला असला तरी न्यूयॉर्क शहरातील व्यवहार मात्र बंदच ठेवण्यात आले होते. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, 8 जून पासून टप्प्याटप्प्याने हे शहर खुले केले जाईल. पहिल्या टप्प्यात चार लाख कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील ड्युटी जॉईन करता येईल. हे शहर काळजी घेऊनच खुले केले जात असल्याचेहीं त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात बांधकाम, उत्पादन, घाऊक विक्री, किरकोळ विक्रीची दुकाने, टॅक्सी सेवा, कृषी सेवा, मच्छिमार उद्योग ही क्षेत्रे खुली केली जाणार आहेत. गव्हर्नरांच्या या निर्णयाचे न्युयॉर्कच्या महापौरांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आम्ही करोनाला आता हरवत चाललो आहोत आणि करोनाची स्थितीत विलक्षणरित्या सुधारते आहे. अमेरिकेने कोणत्याहीं शहरातील व्यवहार सुरळीत खुले करण्यासाठी सात निकष जाहीर केले आहेत. ते निकष न्यूयॉर्क शहराने पुर्ण केल्याने तेथे 8 जून पासून व्यवहार खुले केले जात आहेत असेही त्यांनी नमूद केले.