मुंबई (वृत्तसंस्था) – फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद येथे आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम गुजरात आणि नंतर मुंबई व दिल्ली येथे कोरोना विषाणूच्या प्रसारास जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. राऊत म्हणाले की, या कार्यक्रमात सहभागी काही प्रतिनिधी नंतर दिल्ली आणि मुंबई येथेही गेले.
दरम्यान, राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊन कोणत्याही योजनेशिवाय राबविण्यात आला परंतु आता ते हटवण्याचे काम राज्यांच्या प्रमुखांवर टाकण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशाल मेळाव्यामुळे गुजरातमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला हे नाकारता येणार नाही. ट्रम्पसमवेत असणारे काही प्रतिनिधी नंतर मुंबई व दिल्ली येथे गेले, त्यामुळे या शहरांमध्ये व्हायरसचा संसर्ग झाला, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून संजय राऊत यांनी म्हटले.
24 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अहमदाबादमधील रोड शोमध्ये भाग घेतला होता, ज्यात हजारो लोकांनी हजेरी लावली होती. रोड शोनंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) संचलित मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये एक लाख लोकांच्या जाहीर सभेत भाषण केले होते.