पुणे (वृत्तसंस्था) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरात बसून आहे. काहीच काम नसल्यामुळे सगळेच टिव्हीवरील बातम्या, जुन्या मालिका आणि ‘सोशल मीडिया’द्वारे आपल्या ज्ञानात भर घालत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत करोनाविषयी जनजागृती करताना दिसत आहेत. यामधून अनेक अफवांचे मॅसेजेसही फॉरवर्ड केले जात आहेत. काही जणांकडून विनोदी ‘मीम्स’सुद्धा वाचायला मिळत आहेत.सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे बातम्या पाहून कंटाळा आल्यावर विरंगुळा म्हणून सर्वच जण व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, टिकटॉक अशा सोशल मीडियावर आपला वेळ अधिक प्रमाणात घालताना दिसत आहेत. अनेक प्रकारचे मॅसेजेस, व्हिडिओ, फोटो, मीम्स ग्रुपवर पडत आहेत. या मेसेजेसमध्ये अनेक जणांकडून करोनाविषयी जनजागृती केली जात आहेत. त्यात काही फेक मॅसेजेसही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या नावाने फेक मॅसेस टाकणाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अशा फेक मॅसेजेसवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन वेळोवेळी शासनाकडून केले जात आहे. विनोदी कार्टून व मीम्स, व्हिडिओ एकीकडे करोनामुळे सर्व जण दहशतीमध्ये आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जणांकडून जनजागृतीचे मॅसेजेस फॉरवर्ड केले जात आहेत. असे असले तरी काही लोकांकडून करोनासंदर्भात काही विनोदी कार्टून, मीम्स, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहीजण बिस्कीटाला किती छिंद्र आहेत, पंखा बंद केल्यावर किती मिनिटांनी फिरायचा थांबतो, एक किलो गव्हामध्ये किती दाणे असतात, पत्त्यामधील बदामच्या राजाला मिशीच नाही, अशा पोस्ट टाकत आहेत. या मॅसेजेस, फोटोमुळे घरात बसून टाइमपास करणाऱ्यांची मात्र करमणूक होत आहे. काही विनोदी मॅसेजेस असे आहेत.
घरात बसून अंग आंबले असेल, तर थोडावेळ चौकात फिरून या. पोलिसांतर्फे मसाजसेवा सुरू आहे. सेवेचा लाभ घ्या.- जनहितार्थ जारी
शहरातून गावाकडे आलेल्यांना विनंती, आला आहाताच तर घरातच बसा, विनाकारण अर्ध्या चड्डीवर गावभर बढाया मारत फिरू नका…- गावकरी
मुंबई, पुण्यात मुलांचा स्वतःचा फ्लॅट असावा, नोकरी असावी असं म्हणणाऱ्या मुली टॅंकरमध्ये बसून मिळेल त्या गाडीने गावाकडे भुर्रर्रर्रर्रररर… (परी हूँ मैं… आता घरी हूँ मैं)
पेशंट : डॉक्टर साहेब, मला खाली बसायला खूप त्रास होत आहे.
डॉक्टर : तुम्ही कर्फ्यू पाहायला गेला होता का?
पेशंट : होय, तुम्ही कसं ओळखलं?
डॉक्टर : सध्या त्याचीच साथ सुरू आहे.