नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स अथवा रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ नये यासाठी एन-९५ हा विशेष मास्क अत्यावश्यक मानला जातो. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे आज एन-९५ मास्कचा उपलब्धतेबाबत माहिती देण्यात आली असून सरकारी आकडेवारीनुसार देशातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ११.९५ लाख मास्क उपलब्ध आहेत. याखेरीज देशातील दोन मास्कनिर्माते सध्याच्या घडीला दररोज ५० हजार मास्कची निर्मिती करत असून हे उत्पादन पुढील आठवड्यापर्यंत दुप्पट केले जाईल असे देखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशामध्ये गेल्या बुधवारपासून २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून अत्यावश्यक सेवा वगळता अख्खा देश ठप्प झाला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.