मुंबई (वृत्तसंस्था) – करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठे आहे. जर सूचनाचे पालन केले नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. शरद पवार यांनी आज दुसऱ्यांदा फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले कि, करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचे पालन करा. घरातच थांबा, बाहेर पडू नका. लॉकडाउनच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याला जपा. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा आहे. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. त्याचबरोबर अशा काळात काळाबाजार होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. आजच्या स्थितीतही राज्य सरकार सामंजस्यपणानं काम करत आहे. सरकारला कठोर भूमिका घ्यायला भाग पाडू नका. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची गरज नाही, असेही पवारांनी सांगितले.