नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरस कोणत्याही दहशतवादी हल्ल्यापेक्षा अधिक खतरनाक आहे. याविरोधात सर्व देशांनी एकजूट होऊन लढा द्यायला पाहिजे,असे जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) म्हंटले आहे. डब्लूएचओचे महासंचालक डॉ. तेद्रोस गेब्रियेसस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
डॉ. तेद्रोस गेब्रियेसस म्हणाले कि, करोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी सर्व नागरिकांना एकत्र उभे राहण्याची गरज आहे. हा व्हायरस मोठी विनाश करू शकतो, असे मी याआधीही सांगितले आहे. हा कोणत्याही दहशतवादी हल्ल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. करोना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेत मोठी अस्थिरता निर्माण करू शकतो.
करोनाची लस विकसित करण्यासाठी एक-दीड वर्षाचा कालावधी लागेल, असे यापूर्वीच सांगितले आहे. मात्र आम्ही संयुक्तपणे एक कार्यक्रम राबवत असून यानुसार अनेक संस्था आणि देश एकत्र मिळून वेगाने संशोधन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत २३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, परंतु ते पुरेसे नाही. आणखी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.