जळगाव – जिल्हा कारागृहातून दोन साथीदारांसह पलायन केलेल्या गौरव विजय पाटील याला आज स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने भोईसर (मुंबई) येथून अटक करण्यात आली आहे.
दरोडा, जबरी लूट, प्राणघातक हल्ला प्रकरणात डीसेंबर-१९ पासून कारागृहात असलेला बडतर्फ पेालीस सुशील अशोक मगरे याने गौरव विजय पाटील, सागर संजय पाटील यांच्यासह २५ जून रोजी जिल्हा कारागृहातून सुरक्षा यंत्रणेला पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा केला हेाता. जगदीश पाटील याने आणलेल्या दुचाकीवर तिघा कैद्यांनी नवापुर(नंदुरबार) गाठल्यावर तेथून वेगळे-वेगळे होत पळ काढला होता. एक महिन्यानंतर दि.24 रोजी जगदीशला अटक करण्यात आली, चारच दिवसांनी सागर संजय पाटील याला गुन्हेशाखेने अटक केली होती. कैदी पळवून नेण्यात सहभागी अमीत ऊर्फ नितेश सुदर्शन चौधरी ऊर्फ बिहारी, नागेश मुकूंदा पिंगळे या देाघांनाही अटक करण्यात आली असुन चारही संशयीत कोठडीत आहेत.
भोईसर येथून अटक
सुशील मगरे, सागर पाटील आणि गौरव विजय पाटील असे तिघे पळून गेल्यानंतर त्यांनी नवापुर (नंदुरबार )गाठले तेथून वेगवेगळे झाले होते. गौरव हा मगरेच्या सांगण्यानुसार मुंबईकडे पळाला होता. अमळनेर येथून गुप्त माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हशेाखेचे निरीक्षक बापु रेाहोम यांच्या पथकाने भोईसर मुंबई येथे गेल्या आठ दिवसांपासुन सापळा रचला होता.
दरम्यान आज दुपारी गौरव खोलीवर परतत असतांना आढळून आला. त्याला अलगद पोलिस पथकाने झडप मारुन अटक केली.