जुन्नर (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन काळात बांधकाम किंवा त्या संबंधित सर्व कामांना बंदी घातली असली तरी जुन्नर शहरात काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. याबाबत प्रशासनाने शहरातील तिघांना नोटिसा धाडल्या आहेत. खुद्द शाम पांडे या नगराध्यक्षांना रविवार पेठेतील बांधकाम सुरू असल्याबाबत नोटीस पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा एक व्हीडीओ गुरुवारी (दि. 30) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या तीनही कामांची पाहणी केली असून, याठिकाणी काम बंद केल्याचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे कलिंगड विकणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला होता. वडगाव सहानी येथील दशक्रियेवेळी अधिक नागरिक जमा केल्याच्या कारणावरून ज्याच्या घरी निधन झाले आह, त्या व्यक्तींवर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पंपावरून इंधन आणणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी जप्तीसह गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात, याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
शहरात बांधकामासोबत रंगरंगोटी, सिलिंग पीओपी, फरशी बसवणे आदी कामे सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अनेक गावांमध्ये शहरातून येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरूच आहे. यामुळे करोनाविरुद्ध जोरदार लढा देणाऱ्या पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची अधिक शक्ती खर्च होत आहे. दरम्यान, शहरातील बांधकाम संघटनेने बांधकामाबाबत प्रशासनाकडे मागितलेली परवानगी नाकारली असून संघटनेच्या सदस्यांची सर्व कामे बंद असल्याचे अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी सांगितले आहे.
सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून जुन्नर शहरात मात्र शटर बंद करून सलूनमध्ये काम सुरू असल्याचे आज (दि. 2) उघडकीस आले आहे. येथे फेशियल आणि दाढी करून घेणारे कोणी सामान्य नागरिक नसून बंदोबस्तावर असलेले राखीव पोलीस दलाचे दोन जवान होते. त्यांना जुन्नर शहर नाभिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सचिन कालेकर व शहर अध्यक्ष सतीश डाके यांनी रंगेहाथ पकडले आहे.
याबाबतची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वसामान्यांना काठीने जरब बसविणारे पोलीसच कायदा मोडत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बाजारपेठेतील पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यात असणाऱ्या दुकानात शटर लावून दाढी, कटिंग केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच पोलीसच दुकानात येत असल्याने चालकाची अरेरावी वाढली होती.
दरम्यान लॉकडाऊन काळात सलूनमध्ये जाऊन दाढी, फेशिअल करणाऱ्या या दोन जवानांची जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने बारामती येथे बदली करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.