नाशिक (वृत्तसंस्था) –करोनो विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनस्तरावर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांना आणि मंदिरांना गर्दीचे कार्यक्रम घेणे टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद वाढत असून विविध देवस्थानच्या यात्रा तसेच उत्सव रद्द केले जाऊ लागले आहे. जगभरात कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून श्री. काळाराम संस्थानच्या वतीने होणाऱ्या वासंतिक नवरात्रोत्सव कार्यक्रमातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच रद्द करण्यात आले आहेत. मात्र, उत्सवाच्या काळात मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा नियमित होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मंदिरांमध्ये देशासह जगभरातील भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. अशा ठिकाणी शिंकणे, खोकणे या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी श्री. काळाराम संस्थानच्या वतीने भाविक आणि भक्तांचे हित लक्षात घेत २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत सुरू असणाऱ्या वासंतिक नवरात्र उत्सवातील व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे.दरम्यान,येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची अवघ्या महिन्यावर आलेली चैत्र पौर्णिमा यात्रा कोरोना व्हायसरच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता. ११) झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला आहे.लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या येथील येडेश्वरी देवीची यात्रा यंदा नऊ ते २३ एप्रिल दरम्यान होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय येथील विठ्ठल -रुक्माई मंदिराच्या आनंदधाम येथे बुधवारी आयोजित प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला आहे.