●साकळीसह परिसरातील शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात
● शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून
चुंचाळे ता.यावल(वार्ताहर)- कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले असतांना या कालखंडात शासकीय स्तरावर कापूस खरेदी होत नसल्याने साकळीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठया आर्थिक अडचणीच्या गर्तेत सापडलेला असून शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण होत आहे. तरी शासनाकडून कापूस खरेदी बाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास साकळीसह परिसरातील शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे. या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत सविस्तर असे की, यंदा साकळी सह परिसरात कापसाचे उत्पादन सरासरी चांगले झालेले आहे. व या नगदी पिकावर शेतकऱ्याची वर्षभराची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र उत्पादित झालेल्या कापसाचे शासकीय स्तरावर खरेदी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला घरात भरून ठेवलेला आहे. त्यांना आशा आहे की आज ना उद्या शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होईल व आपला कापूस खरेदी केला जाईल मात्र अद्याप पर्यंत शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून संतप्त भावना निर्माण झालेली आहे. सध्या कोरोनाच्या आजाराने लॉकडाऊन करण्यात आलेले असल्याने आता तर कापूस खरेदी बाबत अनिश्चितता जाणवत आहे परिणामी काही शेतकऱ्यांना आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी आपला कापूस मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना देऊन मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कापसाचे उत्पादन घेण्यासाठी खूप मोठा खर्च येतो. मजुरीही मोठ्या प्रमाणात दिली जाते. त्यामुळे या पिकासाठी झालेल्या खर्चही निघणे कठीण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
●नवीन कपाशी लागवड आली वेळ- किमान मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून उन्हाळी कापूस लागवडीची प्रक्रिया सुरू होत असते. मात्र अद्यापर्यंत मागील हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पैसा हाती नसल्याने नवीन कापूस लागवड कशी करावी याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सतावीत आहेत. तसेच दीड-दोन महिन्यात मौसमी पावसाचे वातावरण तयार होईल. यामुळे घरातील साठवलेला कापूस खराब होण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनावर शेतकऱ्याचा रोष वाढलेला असून परिसरातील शेतकरी आमरण उपोषण करण्याच्या मानसिकतेत आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी लक्ष देऊन तालुकास्तरावर कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करावे.अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.







