जालना (वृत्तसंस्था) – जालन्यात आणखीन पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतांनाच शुक्रवारी रात्री उशिरा परजिल्ह्यातून जालन्यात आलेल्या पाच संशयित रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळं जालना शहरासह जिल्ह्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे.
या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव दलातील जालना येथील तुकडीतील जवान असून एक रुग्ण हा मुंबई येथून परतूर तालुक्यात परतला होता. जालना येथील राज्य राखीव दलातील चार जवान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बंदोबस्त करून आले होते. तर परतूर तालुक्यातील सातोना परिसरातील एक व्यक्ती शुक्रवारी सकाळी जालन्यात परतल्यानंतर या पाचही संशयीत रुग्णांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांचे लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोग शाळेकडून या संशयित पाचही रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्हा सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह जिल्हा वासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.