मुंबई (वृत्तसंस्था) – जगात ‘करोना’ व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. अशातच दिल्ली, निजामुद्दीत येथे तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमाला देशातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यातच भारतातही गेल्या 24 तासात 380 प्रकरण समोर आली असून रुग्णांचा आकडा 1600 पार गेला आहे. अशातच करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सध्या लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी तरुणांना लॉकडाउन दरम्यान काय करायला हवे याबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार म्हणाले,’तरुणांनी घरी बसून वाचन करावं आणि आपलं ज्ञान वाढवावं , देशात काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. आपल्याकडे साहित्याची मोठी खाण आहे. लोकांनी घरात बसून ते वाचावं. वाचन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य यांच्यावरील साहित्य सर्वांनी वाचावं. सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद ठेवावा. तसंच तरूणांनी ज्ञान वाढवावं. लॉकडाउनच्या काळात वाचन वाढवा,’ असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.