पुणे (वृत्तसंस्था) – करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेक्षण करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून या पथकाकडे असणारे फॉर्मसुध्दा काही नागरिकांकडून दमदाटी करून फाडले जात असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. करोना रुग्ण सापडलेल्या पाच किलोमीटर परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व्हे करण्यात येत असून महापालिकेने यासाठी खास पथक तयार केली आहेत. या सर्व्हेमध्ये घरातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला असे असल्यास त्याची माहिती या पथकाकडील कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येते. मात्र, येरवडा येथील झोपडपट्टीमधील काही नागरिकांनी या पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास नकार देत इतरांनाकडूनही माहिती घेण्यास मनाई केली. एवढेच नाही तर काही नागरिकांनी भरलेले फॉर्मही फाडून टाकले. तसेच सर्वेचे काम करीत असताना काही युवक पाठीमागे येऊन सर्वे करू नका, असा दम देत असल्याने या कर्मचाऱ्यांनी सांगितले.करोना बाधित रुग्ण असल्यास पालिकेकडून रुग्णाची माहिती संकलित करून तो रुग्ण राहात असलेल्या परिसराची तपासणी करता येईल. मात्र, घरातील व्यक्तींची ताप खोकला तसेच करोना संदर्भातील लक्षणे आदींची माहिती घेण्यासाठी या पथकाची अडवणूक केली जात आहे.शहरातील इतर ठिकाणीही आम्ही सर्वे केला, तेथे नगरिकांनी सहकार्य केले; परंतु येरवडा येथील अनुभव फारच विचित्र आहे. कसले सर्व्हेक्षण करता, तुम्हाला कोणी सांगितले, डॉक्टरांना घेऊन या, असे सांगून एकावेळी 15 ते 20 लोक आमच्या अंगावर धावून येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलीस संरक्षण असल्याशिवाय काम करणार नसल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.सर्वेक्षण करण्यास कर्मचाऱ्यांना अडचणी आल्या आहेत. वरिष्ठांना याबाबत कळविले असून पोलीस संरक्षण घेऊन हे सर्वेक्षण करण्यात येईल.- डॉ. माया लोहार, आरोग्य अधिकारी, येरवडा