रायगड (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील उरण तालुक्यात असणाऱ्या जेएनपीटी बंदरामध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांमधून हजारो कामगार येत आहेत. याचा धोका उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला आहे. या कामगारांची तसेच वाहनांची तपासणी उरणच्या वेशिवरच व्हावी अशी मागणी उरण सामाजिक संस्थेकडून करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार पाहता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये जेएनपीटी बंदर हे देशातील महत्वाचं आयात निर्यातीचं केंद्र असल्याने हे बंदर सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमधून कामगार जेएनपीटी बंदरात हजारोंच्या संख्येने येत आहेत. याबाबत प्रश्न उपस्थित करताच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अत्यावश्यक सेवा बंद करता येणार नसून, मुंबईसारख्या ठिकाणाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून तिथेच ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र ते शक्य नसल्याचे म्हटले आहे.
जेएनपीटी हे देशातील प्रमुख आयात निर्यातीचं केंद्र असल्याने ते सुरू राहणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातून येणाऱ्या कामगारांमुळे उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला याचा धोका निर्माण झाला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक कामगाराची तसेच प्रत्येक वाहनांची तपासणी तालुक्याच्या वेशिवरच झाली पाहिजे अशी मागणी उरण तालुक्यातील अग्रेसर असणाऱ्या “उरण सामाजिक संस्थेच्या” माध्यमातून करण्यात आली आहे.