वॉशिंगटन (वृत्तसंस्था) – चीनच्या वुहान शहरातील विषाणूशास्त्र प्रयोगशाळा हे करोनाचे उगमस्थान असून तेथून त्याचा जगभर फैलाव झाला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. मात्र आता हा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फेटाळला आहे.
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन परिस्थितीचे प्रमुख डॉ.मायकेल रायन म्हणाले कि, करोना व्हायरसच्या जनुकीय क्रमाचा अभ्यास केलेल्या वैज्ञानिकांशी आम्ही चर्चा केली आहे. यानुसार, करोना नैसर्गिकरित्याच उत्पन्न झाला असल्याचा विश्वास आम्हाला आहे. तसेच करोना व्हायरसच्या नैसर्गिक स्रोताचा शोध लागणे आवश्यक असून त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. आणि यामुळे भविष्यातील अशा प्रकारचा धोका टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभारावर आम्ही नाखुश आहोत. त्यांनी आमची दिशाभूल केली आहे. ते चीनच्या हातचे बाहुले झाले आहेत, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.