नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंजाबमध्ये काही दिवसापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याचे तलवारीने हात कापल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एकधक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबातील जालंधर शहरामध्ये एका तपासणी चौकीवर पोलिसांनी गाडीतून जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी तपासणी करण्यासाठी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता या व्यक्तीने थेट पोलिसांच्या अंगावरच गाडी चढवण्याचा प्रयत्न केला.
तपासणी चौकी आल्यानंतर गाडीचा वेग कमी करण्याऐवजी तो वाढवत चालक एक पोलीस अधिकाऱ्याला काही फुटांपर्यंत आपल्या गाडीच्या बोनेटवर घेऊन गेला. इतर पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी थांबवली आणि पोलीस अधिकाऱ्याची सुटका केली. यासंदर्भातील व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.
‘जालंधर शहरामध्ये एक कार चालक पोलीस अधिकाऱ्याला आपल्या गाडीच्या बोनेवट काही अंतर घेऊन गेला. हा पोलीस अधिकारी या व्यक्तीला लॉकडाउनच्या काळात सुरु असणाऱ्या तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत होता,’ असं एका वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी गाडीच्या बोनेटवर असतानाही गाडी वेगाने धावता दिसत आहे. पोलीस अधिकारी गाडी बोनेटला पकडून असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलीस अधिकारी गाडीचा पाठलाग करुन तिला थांबवतात आणि नंतर चालकाला ताब्यात घेतात असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
एप्रिल महिन्यामध्ये पतियाळा येथे लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता पोलिसाचा हात कापल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या घटनेच्या प्रसंगाला समोरे जावे लागले.