जळगाव (प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वी मेहरूणमधील रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर उडालेली खळबळ शांत होत नाही तोच शहरातील दुसरा रूग्णदेखील पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच मेहरूण येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर आज सायंकाळी आणखी एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मेहरूणच्या रूग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे आप्त आणि अन्य लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या कालच निगेटीव्ह आलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, आज दुसरा संशयितदेखील पॉझिटीव्ह आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, दुसरा रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हावासियांनी लॉकडाऊनचं तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. याचाच भाग म्हणून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव जिल्ह्यातील नागरिक लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, येणारे दोन आठवडे अधिक काळजीचे असल्याने जळगाव जिल्हावासियांनी घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. जीवनावश्यक वस्तूचा कुठलाही तुटवडा भासणार नाही. त्यामुळे त्या घेण्यासाठी गर्दी करू नये. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची साखळी अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.