पुणे (वृत्तसंस्था) – पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना करोनाची लागण झाली आहे. त्याचा तपासणी अहवाल आज (दि. 29) पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महेश लांडगे हे भोसरी विधानसभेतून निवडून आलेले आहेत. त्यांच्याकडे शहर भाजपची सूत्रे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा बाहेर वावर आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौऱ्यावर आले असताना आमदार लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांची आज तपासणी केली जाणार आहे.
आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.







