अकोला (वृत्तसंस्था) – शहरात कोरोना विषाणूने आता चांगलेच बस्तान मांडले आहे. मंगळवारी एकाच दिवसात पाच नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यातील तीन रुग्ण हे सिंधी कॅम्प परिसरातील रुग्णाचे नातेवाईक आहेत, तर दोघे त्याच्या प्रतिष्ठानात कार्यरत कामगार आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंधी कॅम्प पाठोपाठ आता कृषीनगर परिसरातील न्यू भीमनगर व खदान परिसर देखील सील करण्यात आला.
जिल्ह्यात दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तर दुसरीकडे नव्याने वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या अकोलेकरांची चिंता वाढविणारी ठरत आहे. रविवारी सिंधी कॅम्प परिसरातील एका 41 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 47 संदिग्ध रुग्णांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी यातील 41 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये रुग्णाची पत्नी, दहा वर्षाचा मुलगा, त्याची वहिनी आणि कृषिनगर येथील रहिवासी त्याच्या दुकानातील दोन कामगारांचा समावेश आहे. एकाच दिवशी पाच नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अकोल्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 22 वर पोहोचली आहे. तर आठ जणांना कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू आणि एकाने आत्महत्या केली आहे. सद्यस्थितीत एकूण 12 कोरोना बाधित रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सील करण्यात आलेल्या भागात महापालिकेचे 15 पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत कृषिनगर परिसरातील न्यू भीमनगर आणि जीएमडी मार्केट परिसरात सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे.