नवी दिली (वृत्तसंस्था) – कट्टरतावादी गट कोविड -19 मुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत आहेत आणि सोशल मीडियासाठी अधिक वेळ ऑनलाइन व्यतीत करणाऱ्या तरुणांना भरती करून घेण्यासाठी सोशल मीडियावरच अधिक सक्रिय आहेत, असा दावा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनियो ग्युटरेस यांनी केला आहे. करोनाची साथ पसरण्यापूर्वीच पाचपैकी एका युवकाला चांगले शिक्षण, प्रशिक्षण किंवा काम मिळत नव्हते. चारपैकी एका युवकावर हिंसाचार आणि संघर्षाचा परिणाम होत होता. दरवर्षी 12 दशला मुलींना अकाली मातृत्व येत असते, अशी टीकाही त्यांनी केली. हे नैराश्य आणि अपयशातून आलेला उद्वेग यामुळेच तरुणांचा राजकारणाबाबतचा आत्मविश्वास उडायला लागला आहे. अशा युवकांना कट्टरवादी कारवायांमध्ये खेचणे खूपच सोपे असते. त्यांच्या रागाचा आणि निराशेचा उपयोग कट्टरवाद पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी भीतीही ग्युटरेस यांनी व्यक्त केली.
मात्र तरिही आजचे युवक सक्रिय राहण्यास उत्सुक आहेत. एकमेकांना सहाय्य करत आहेत आणि करोनाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोलंबिया, घाना, इराक आणि इतर अनेक देशांतील तरुण लोक मानवतावादी कार्यामध्ये सामील होत आहेत, याकडे ग्युटरेस यांनी लक्ष वेधले. जगातील सर्व संघर्षांत युध्द बंद पुकारण्याच्या 23 मार्चच्या आपल्या आवाहनाला तरुण लोक देखील पाठिंबा देत आहेत, असेही ग्युटरेस यांनी सांगितले.