पुणे (वृत्तसंस्था) – करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य धोका पाहून जिल्हा परिषदेकडून आता इतर गंभीर आजार (कोमारबीड) असलेल्या रुग्णांची तत्काळ तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना केल्या आहेत.
दैनंदिन अहवालावरून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. गंभीर आजारी रुग्ण आढळून येत आहेत, त्यांना अनेक गुंतागुतींना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी अशा रुग्णांची तत्काळ तपासणी करण्यासाठी औंध येथील जिल्हा शल्य चिकित्सकांशी समन्वय ठेवून पुढील तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा तपासणीची सुविधा असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये या रुग्णांची त्वरीत तपासणी करून घेण्यात येणार आहे. इतर गंभीर आजारांमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडणीचे विकार या गंभीर आजारांचा समावेश होतो.
घरोघर जाऊन सर्व्हेक्षण जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दिलेल्या सूचनांप्रमाणे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. लक्षणे आढळून आलेल्या अथवा करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. हे काम एका बाजूला सुरू असले तरीदेखील करोनाची संख्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये इतर गंभीर आजार असलेल्यांना जास्त धोका संभवत असल्याने अशा आढळून आलेल्या रुग्णांची तत्काळ तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाचा वाढता प्रसार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.