मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाचे काम 29 व 30 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
सोमवारी मंत्रालयात आणखी दोघांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. लागण झालेल्यांपैकी एक कर्मचारी सहाव्या मजल्यावर मंत्री, अधिकार्यांच्या कार्यालयात साफसफाईचे काम करत असल्याची माहिती आहे. यशिवाय मंत्रालयाच्या आवारात उभ्या राहणार्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि बांधकाम खात्यातील एका कर्मचार्यालाही लागण झाली आहे.