नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काही संशोधकांचा असा दावा होता की, वातावरणातील उष्णता वाढल्यावर कोरोनाचं संक्रमण पसरण्यावर निर्बंध येऊ शकतात. आता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, वातावरणात उष्णता वाढल्यामुळे आपल्याला फायदा होईल.मात्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अजून उन्हाळा सुरू व्हायला अवकाश आहे. भारताच्या अनेक भागात पुढील दोन आठवडे वातावरण हे सामान्य असणार आहे. आयएमडीचे प्रमुख मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागात दोन-तीन दिवसांत पश्चिमी हवेसोबत पावसाची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर येत्या काळात हिमालयसारख्या क्षेत्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. महापात्र यांनी सांगितल्याप्रमाणे दोन आठवड्याच्या आत भारताच्या अनेक भागात तापमानात लक्षणीय बदल होणार आहे. मात्र देशाच्या ज्या भागात सध्या उष्णता जास्त आहे, तेथे कोरोनाचे संक्रमण कमी असल्याचेही आढळून आले आहे. याचाच अर्थ उष्णता करोनाला रोखण्याचे काम जर करत असेल तर भारतीयांसाठी निश्चितच ही संकटकाळी मिळालेली अमूल्य मदत ठरणार आहे.