नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आत्तापर्यंत 27 लोकांची चौकशी केली आहे. यात यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माचाही समावेश आहे. पोलिस चौकशीत शानू शर्माने काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. आदित्य चोप्रा आणि ‘पानी’चा दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात आलेल्या काही मतभेदांमुळे ‘पानी’ चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे यशराज फिल्म्सवर सुशांत नाराज होता, असा खुलासा शानू शर्माने आपल्या जबाबत केला आहे.

शानू शर्माने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, यशराजसोबत ‘पानी’ हा तिसरा चित्रपट करण्यास सुशांत खूप उत्सुक होता. यशराज यांनाही हा चित्रपट बिग बजेट चित्रपट बनवायचा होता. यशराजने या चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीसाठी 4-5 कोटी रुपये खर्चही केले होते़ परंतु आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात हा चित्रपट करण्यासाठी एकमत झाले नाही. या दोघांमध्ये चित्रपट विषय क्रीएटिव डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही. हा चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे सुशांत नाराज होता आणि त्याने यशराज फिल्म्स सोडण्याचा निर्णय घेतला होता.
करार मोडल्यानंतरही सुशांतला यशराजने जाण्याची परवानगी का दिली, असा सवाल पोलिसांनी शानू शर्माला केला असता तिने सांगितले की, ‘सुशांतने आम्हाला यशराज सोडण्याची विनंती केली होती. यशराजला देखील हा विषय जास्त ताणून धरायची इच्छा नव्हती. हा करार प्रत्येकाच्या संमतीने संपत होता, म्हणून यशराजांनी सुशांतवर तिसरा चित्रपट करण्याचा आग्रह धरला नाही आणि तो करारातून बाहेर पडला.







