नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत आणि चीन दरम्यान झालेल्या हिंसेवरून देशात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यावरूनच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘Surender Modi’ असा ट्विट केला. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. जर चर्चाच करायची असेल तर संसदेत या, १९६२ पासून आजपर्यंत काय काय घडलं त्यावर चर्चा करु असे आव्हानच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिले आहे.

काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष अत्यंत घाणेरडं राजकारण करत आहेत याची मला कीव येते आहे. काँग्रेसच्या नेत्याची ट्विट्स पाकिस्तान आणि चीनला आवडत आहेत ही बाब दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा चिंतेचा विषय आहे असंही अमित शाह यांनी म्हटले आहे. करोनाची लढाई भारताने अत्यंत स्थैर्याने आणि धैर्याने लढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात करोनाची लढाई अत्यंत धैर्याने आपण लढलो आहोत. जगाच्या तुलनेत आपण करोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढलो आहोत.
आपल्याकडे परिस्थिती जगाच्या तुलनेत बरीच नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि दिवे लावले गेले, घंटा वाजवल्या गेल्या. एकाही पोलिसाशिवाय कर्फ्यू पाळला गेला. यासारखी बाब मी तरी माझ्या कारकिर्दीत पाहिलेली नाही. हे सगळं मोदींच्या नेतृत्त्वामुळे शक्य झालं आहे असे गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनापुढे हात टेकले हे म्हणणं साफ चुकीचे आहे असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.







