नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनावर अद्याप विशिष्ट उपचार पद्धती अवगत झाली नसल्याने जगभर चिंतेचे वातावरण आहे. भारतासह जगभरातील अनेक देश सध्या कोरोनावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर वापर उपायकारक ठरू शकतो का? याचा उलगडा करण्यासाठी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करत असून याला काही ठिकाणी यश देखील आलं आहे. अशातच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे कोरोना उपचारात प्लाझ्मा थेरपीचा वापर हा अद्याप प्रायोगिक तत्वावर केला जात असल्याचा उलगडा केला आहे. याबाबत बोलताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी, ‘देशामध्ये सध्या प्लाझ्मा थेरपीचा कोरोना उपचारासाठी प्रायोगिक तत्वावर वापर केला जातोय. असं असलं तरी अद्याप प्लाझ्मा थेरपी कोरोनावरील उपचार पद्धती ठरू शकते असा कोणताही पुरावा हाती आला नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे सध्या प्लाझ्मा थेरपीच्या कार्यक्षमतेबाबत अभ्यास केला जातोय.’ अशी माहिती दिली. जो रुग्ण तीन आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाज्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाज्मा घेतला जाऊ शकतो, तर करोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवला जातो. करोना व्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाज्मा अशा रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाज्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील. याला सरकारकडून परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरून त्यांना वाचवता येईल. मात्र त्यासाठी करोनावर मात केलेल्या रुग्णांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.