मुंबई (वृत्तसंस्था) – देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सर्व दुकाने, खासगी कंपन्या, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठा बंद राहिल्याने लोकांना भाज्या मिळत नव्हत्या. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मुंबई कृषी उत्पन बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे.
बाजारपेठ सुरू होणार असल्याने बाजारपेठेच्या गेटवर महत्त्वाची सूचनाही लावण्यात आली आहे. या सूचनेमध्ये म्हटले की, व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझरने हात धुवून आणि मास्क तोंडाला बांधून मार्केटमध्ये प्रवेश करावा. जर या सूचनेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक नियोजन करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी अडवू नये, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. बाजारपेठा बंद असल्याने भाज्यांचा तुटवडा होत होता. त्यामुळे नागरिकांनाही भाज्या मिळत नव्हत्या. भाज्या मिळत नसल्याने भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. त्यामुळे बाजारपेठा सुरू करण्यात येत आहे.