पुणे (वृत्तसंस्था) – मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला आणि कांदा बटाटा विभाग 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. शुक्रवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांच्या झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. याबाबतची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची आणि कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांमध्ये भीती पसरली आहे.
lत्यामुळे कामगार संघटनांनी आणि सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करत आडते असोसिएशन आणि भुसार विभागात दि पूना मर्चंट चेंबरने बंद पुकारला होता. चेंबरने बंद मागे घेतला असून, भुसार बाजार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची बैठक झाली. यामध्ये वरील निर्णय झाला. याविषयी उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, येथील व्यापार सुरळीत सुरू झाला पाहिजे, यासाठी दररोज येणाऱ्या खरेदीदारांना ओळखपत्र दिले पाहिजे. जेणेकरून लॉकडाऊन मुळे खरेदीदारांची वाहने बाहेर पोलिसांकडून अडवली जाणार नाहीत. तसेच, खरेदीदारांना त्यांना स्टॉल, हातगाडीवर किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली पाहिजे .तरच ते मार्केट यार्ड तून फळे आणि भाजीपाला खरेदीदार खरेदी करतील. अन्यथा मार्केट यार्डातील मालाची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे. दुसरीकडे कामगार काम करण्यास तयार झाले आहेत. याविषयी कामगार असोसिएशनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, बाजार समितीने कामगारांना ओळखपत्र दिली पाहिजेत. जेणेकरून कामावरून येताना -जाताना त्यांना पोलीस अडवणार नाहीत. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या धर्तीवर कामगार, हमाल आणि तोलणार यांचाही विमा काढावा. बाजारात सर्व सुरक्षिततेची साधने उपलब्ध करून द्यावीत