लखनऊ (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेश बोर्डाच्या दहावी आणि बारावीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे हे निकाल एक महिना उशिरा जाहीर करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांना हे निकाल उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. विद्यार्थी वेबसाइटच्या होम पेजवरच निकाल पाहू शकणार आहेत. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा म्हणणं आहे की, यावर्षीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला लागला आहे.

दरम्यान, दहावीचे 83.31 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यंदाही मुलींनी बजी मारली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी उत्तम असल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सांगितल्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये 52 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच पुढे ते म्हणाले की, फक्त 21 दिवसांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्याचं एक आव्हानच होतं.
दिनेश शर्मा पुढे बोलताना म्हणाले की, ‘यावेळी एकत्रच 18 फेब्रुवारी रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या होत्या. दहावीच्या परीक्षा 3 मार्च रोजी आणि इंटरची परीक्षा 6 मार्च रोजी संपली.’
रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिशिअल वेबसाइटवर आपला सात अंकी रोल नंबर आणि शाळेचा क्रमांक टाकावा लागेल. उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावीचे रिझल्ट पाहण्यासाठी खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता.
www.upmsp.edu.in , www.upmsp.nic.in, www.upresults.nic.in, www.upmspresults.up.nic.in .







