दिल्ली (वृत्तसंस्था) – श्रीनगर, कोरोना, दहशतवाद आणि भूकंप अशा तीन संकटांच्या माऱ्याने जम्मू काश्मीरमध्ये राहणारे नागरिक धास्तावले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये आज (शनिवारी) दुपारी १२ वाजून ३२ मिनिटे आणि २४ सेकंदांनी ४.४ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या सौम्य धक्क्यामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे अद्याप एकही वृत्त हाती आलेले नाही. याआधी १४ जून रोजी ३.३ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला होता.

देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ११ हजारांच्या टप्पा ओलांडून पुढे सरकली आहे. भारतात १ लाख ९८ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संकट दररोज अधिकाधिक तीव्र होत असताना भारताला सौम्य स्वरुपाच्या भूकंपांचे (earthquake) हादरे जाणवू लागले आहेत.
शुक्रवारी हरयाणा, मेघालय, लडाखमध्ये भूकंप
हरयाणातील रोहतक आणि आसपासच्या परिसराला दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी २.८ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र रोहतकमध्ये जमिनीखाली ९ किलोमीटर खोलवर होते. याआधी बुधवारी दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी रोहतकमध्ये २.८ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपाचे केंद्र रोहतकमध्ये जमिनीखाली ५ किलोमीटर खोलवर होते. मेघालयमध्ये ३.३ रिश्टर क्षमतेचा सौम्य भूकंप झाला. तसेच लडाखमध्ये संध्याकाळी उशिरा, ८ वाजून १५ मिनिटांनी ४.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप आला. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली २५ किलोमीटर खोलवर होते.







