मुंबई (वृत्तसंस्था)- करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 440 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 19 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूंपैकी 12 मुंबईत, 3 पुण्यात, 2 जळगाव, तर सोलापूर आणि लातूर येथे प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला आहे. २१ दिवसांचा लॉकडाउन ३ मे पर्यंत लांबला. त्यामुळे करोना कधी थांबणार आणि जनजीवन पुन्हा कधी सुरळीत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात करोनाचा प्रसार झाल्यानंतर राज्य सरकारनं अनेक पावलं उचलली. विशेषतः लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत होतं. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयावरूनही लोकांचा गोंधळ उडत होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरूवातीपासुन जनतेच्या मनातील संभ्रम संवादाच्या माध्यमातून दूर करत आहेत. एकूण परिस्थिती हाताळण्याविषयी त्यांचं कौतुक होत असून, अभिनेता रितेश देशमुखनंही याविषयी एक ट्विट केलं आहे. ‘आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत. अशा काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे,’ असं आवाहन अभिनेता रितेश देखमुख यांन ट्विट करून केलं आहे.