पुणे (वृत्तासनस्थ) – करोनाशी लढण्यासाठी अत्यावश्यक घटकातील एक असलेली पीएमपी अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, पीएमपी कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात 25 टक्के कपात करण्यात आली असून, 75 टक्के वेतन मिळाले आहे. याचबरोबर पीएमपी कर्मचाऱ्यांनी संस्थेशी संलग्न बॅंक आणि पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाचे हप्तेदेखील वसूल केल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी अत्यावश्यक घटकांसाठी सेवा देत आहे; परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार पीएमपीच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 75 टक्के पगार देण्यात आल्याने त्यांच्या खात्यात केवळ आठ ते दहा हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिन्याचा खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न उभा राहिला आहे. यासारखी परिस्थिती पीएमपीतील बहुतांश कर्मचाऱ्यांची आहे, असे राष्ट्रवादी कामगार युनियनचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिस्थितीत मार्ग काढून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी युनियनने केली आहे.