नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – एका माणसाने आपल्या पत्नीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या हत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह केल्याचंही वृत्त आहे. पत्नीवर गोळी झाडल्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे. त्या दोघांचे मृतदेह पाहून त्याच्या भावानेही गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अलिगढ येथील बन्नादेवी परिसरात राहणाऱ्या शैलेंद्र याने दोन वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या पिंकी नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. या विवाहाला दोन्ही घरांचा विरोध असल्याने दोघांनीही कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नानंतर दोन्ही घरांत वाद आणखी वाढले होते. या वादाला शैलेंद्र कंटाळला होता.
गुरुवारी शैलेंद्रने फेसबुक लाईव्ह करून या सगळ्या प्रकाराने आपण कंटाळलो आहोत. मी माझ्या घरच्यांमुळे त्रासलो आहे. आता मी असं आयुष्य जगू शकत नाही. माझ्याकडे या प्रश्नाचं काहीही उत्तर नाही. त्यामुळे माझ्या पुढील कृतीवर कुणीही प्रश्न विचारू नयेत. कारण आता मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने संपवत आहे, असं तो या लाईव्हमध्ये म्हणाला होता.
त्यानंतर त्याने पिस्तुलाने आपल्या बायकोवर गोळी झाडली आणि मग स्वतःवरही झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातले आणि शेजारी त्या आवाजाच्या दिशेने धावले. शैलेंद्रचा भाऊ विशाल सर्वात आधी तिथे पोहोचला. त्याने आपल्या भाऊ-वहिनीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्याने गाडी काढली. मात्र, गाडीत घालून नेण्यासाठी जेव्हा तो पुन्हा त्यांच्या खोलीत आला, तेव्हा ते दोघेही गतप्राण झाले होते.
त्यांच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याने विशाल याने त्याच बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली. लोकांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला, मात्र तो मरण पावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.







