मुंबई (वृतसंस्था) – ‘फेअर अँड लव्हली’ कंपनीच्या जाहिराती आणि नाव यामुळे अनेकदा कंपनीवर टीका झाली आहे. हे प्रॉडक्ट रंगभेदाला प्रोत्साहन देत असल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, आता फेअर अॅण्ड लव्हली या क्रीमच्या नावातून ‘फेअर’ शब्द हटवण्याचा आला असून या निर्णयाचे अनेकजण कौतुक करत आहे. 25 जून 2020 रोजी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मराठी अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोनाली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले मत मांडले आहे. सोनाली म्हणाली, सौंदर्य म्हणजे गोरेपणा असं आपल्याकडे समीकरण झालं आहे. आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग किंवा आपला वर्ण आहे.
आपल्याला सगळ्यांना विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. त्यामुळे स्वत:ला आपण नाकारतो आहोत आणि असे वेगवेगळे प्रयोग स्वत:ला गोरं करण्यासाठी आपण करत आहोत. याला आता आळा बसेल आणि आता आपण स्वत:ला स्वीकारू’ असं तिने म्हंटलं आहे.







