नवी दिल्ली -अमेरिका आणि इतर काही देशांपाठोपाठ भारताशी घेतलेला पंगा चीनला महागात पडण्याची शक्यता आहे. स्वत:च्या कुरापतींमुळे तो देश जागतिक पातळीवर एकाकी पडू शकतो. त्याची मोठी किंमत चीनला अनेक वर्षांसाठी मोजावी लागू शकते, असे भाकित सामरिक आणि आर्थिक क्षेत्रांमधील तज्ञांनी केले आहे.

मागील काही काळापासून चीनचे अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरू आहे. व्यापाराशी निगडीत मुद्द्यांवरून चीन आणि ऑस्ट्रेलियातही जुंपली आहे. चीनी आगळिकींमुळे हॉंगकॉंगमधील स्थिती चिघळली आहे. चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील हालचालींमुळे काही देश नाराज आहेत. त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण असनाताच सर्वप्रथम चीनमध्ये उद्रेक झालेल्या करोनाचा फैलाव जगभरात झाला. त्या जागतिक साथीशी अनेक देशांना झुंजावे लागत आहे. अशातच चीनी दुष्कृत्यांमुळे पूर्व लडाखमध्ये त्या देशाच्या सैनिकांचा भारतीय जवानांशी संघर्ष झाला. त्यामुळे ऐन करोना संकटकाळात चीनचा खरा दगाबाज चेहरा चव्हाट्यावर आला. त्यातून चीनची जगभरातील पत कमी होण्यास हातभारच लागणार आहे.
चीन आपल्या कुरापतींद्वारे जागतिक स्तरावर स्वत:चीच कोंडी करून घेत आहे. आक्रमक हालचालींमुळे लष्करी, राजनैतिक आणि आर्थिक पातळ्यांवर चीन स्वत:ला जगापासून वेगळा करून घेत आहे. दु:साहसाची प्रचंड किंमत चीनला चुकवावी लागू शकते, असा इशारा काही तज्ञांनी दिला.
करोना फैलावासाठी चीनला जबाबदार धरले जावे, असा सूर आंतरराष्ट्रीय स्तरावरून उमटत आहे. अशातच चीनबरोबरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पाठिशी लष्करी ताकद उभी करावी, असा विचार अमेरिकेत पुढे आला आहे. त्या घडामोडी पाहता चीनबाबत तज्ञांनी वर्तवलेले भाकित महत्वाचे आहे.







