इस्लामाबाद ( वृत्तसंस्था ) – पाकिस्तान मध्ये कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढला आहे. परंतु, दहशदवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानकडे कोरोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी पैसे नाही आहेत. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे उपासमार या दुहेरी संकटात अडकलेल्या पाकची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला मोठी मदत केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिकदृष्टया कंगाल झालेल्या पाकिस्तानला वाचवण्यासाठी जगभरातील सर्वच देशांपुढे हात पसरले होते. तसेच जागतिक बँकेसोबत अनेकांनी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास चालढकल केली होती. तर मागील वर्षांपासून अमेरिकेने देखील मदत देण्याचे थांबविले होते.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिकेने पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पाकिस्तानमधील अमेरिकी राजदूत पॉल जोन्स यांनी सांगितलं की, अमेरिका पाकिस्तानला ६० लाख डॉलरची मदत करणार आहे. या मदतीमुळे पाकिस्तानमधील आरोग्य सुविधा भक्कम करण्यावरती भर देण्यात येणार आहे.अमेरिकेनं दिलेला निधी हा रुग्णालयातील कोरोना संसर्गित रुग्णांसाठी वापरला जाणार आहे. याशिवाय संसर्ग प्रभावित परिसरात राहणाऱ्या नागिरकांच्या चाचणीसाठी मोबाईल लॅबची सोयही करण्यात येणार आहे.
यामुळं संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पॉल जोन्स यांनी पाकिस्तानमधील जनतेला ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. पाकिस्तान आरोग्य मंत्रालयाच्या नुसार आतापर्यंत ५६ हजार ३४९ कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधमध्ये २१,६४५, पंजाबमध्ये १९,५५७, खैबर-पख्तूनख्वामध्ये ७,६८६, बलुचिस्तानमध्ये ३,३०६ कोरोना संसर्गित रुग्ण सापडले आहे. तसेच एकूण १७१९७ रुग्ण बरे झाले आहेत.