लातूर (वृत्तसंस्था) – दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून शिवीगाळ करुन डोक्यात फरशी घालून डोके फोडल्याची घटना लातूरमध्ये घडली. या प्रकरणी तिघांविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनाजी माधवराव कदम यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गुरुवारी रात्री 8 वाजता तक्रारदार कामावरुन घराकडे परतत असताना कन्हेरी चौकातील पानटपरीवर सुपारी खाण्यासाठी थांबले होते. त्यानंतर तिथे असलेल्या विजय कदम, लक्ष्मण ढोपरे आणि माधव मुठ्ठे यांनी त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादी यांनी आपल्याकडे पैसे नाहीत असे त्यांना सांगितले. त्यावर त्या तिघांनी तक्रारदारांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्याने मारहाण केली. रागाच्या भरात लक्ष्मण ढोपरे याने फरशीचा तुकड्याने तक्रारदारांच्या डोक्यात घाव घातले. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.