पुणे (वृत्तसंस्था) – भवानीनगर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यास धोरणात्मक निर्णयाबाबत साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी निवेदन दिले आहे.
कारखान्याची विद्यमान संचालक मंडळाची मुदत 15 मे 2020 रोजी संपलेली आहे. देशामध्ये करोनाची साथ उद्भवल्यामुळे राज्यशासनाने सर्व निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तरी धोरणात्मक निर्णय घेताना साखर आयुक्त यांची पूर्व परवानगीशिवाय नोकर भरतीसह इतर कुठलेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत.
गळीत हंगाम 2019 – 2020 ची एफआरपी फरकाची रक्कम 400 रुपये प्रतिटन अद्याप बाकी आहे, ती विलंब व्याजासहित त्वरित देण्यात यावी. गळीत हंगाम 2018-19 ची एफआरपी देण्यास विलंब झाल्यामुळे त्यावरील व्याज देण्यात यावे.
कारखान्याचे शेतकी खाते सर्व सभासदांना 8-अ प्रमाणे 7/12 उतारे मागत आहे, याचे प्रयोजन काय आहे. याचे परिपत्रक काढावे, अशा आशयाचे निवेदन कारखान्याचे कार्यकारी संचालकांना देण्यात आले आहे.