नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) नेवासा तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षीय तरुणाने आपल्या नऊ वर्षाच्या मामे बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे. (Cousin Sister Murder) मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी शेतातील खोलीमध्ये नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांना आढळून आला होता. आपल्या मुलीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असावा असं सुरुवातीला तिच्या आई-वडिलांना वाटल्याने त्यांनी तिचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, शाळेने मुलीचा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेत एक लाखाचा विमा काढलेला आहे. त्यामुळे तिचे शवविच्छेदन करून घ्या, म्हणजे एक लाख रुपये मिळतील. असा सल्ला गावातील मंडळींनी दिला. त्यामुळे थेट अंत्यविधी न करता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी मुलीचा मृतदेह नगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ज्यात असं म्हटलं होतं की, मुलीची हत्या करण्यात आली आहे.
प्रथमदर्शनी नऊ वर्षाच्या मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न होताच नेवासा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खुनाचा तपास करत असताना मुलीच्या घरच्यांची देखील पोलिसांनी संशयित म्हणून चौकशी केली. दरम्यान यावेळी मुलीच्या घरी शिक्षणासाठी राहत असलेला तिच्या आत्याचा मुलगा अप्पासाहेब थोरात (वय २२ वर्ष) याची देखील पोलिसांनी सुरुवातीला चौकशी केली होती.
मात्र नऊ वर्षाच्या मुलीचा खून हा तिच्याच आत्याचा मुलगा करेल असं कोणालाही वाटतं नव्हतं. मात्र, पोलिसांना चौकशीदरम्यान जेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली तेव्हा पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्यामुळे अधिक चौकशीसाठी अप्पासाहेब याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला आरोपी काहीही उत्तरं देण्यास तयार नव्हता. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
नऊ वर्षाच्या आपल्या मामेबहिणीची हत्या आपणच केल्याचे आरोपी अप्पासाहेब याने कबूल केल्याने संपूर्ण कुटुंबीयांनाच याप्रकरणी मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असला तरी बहिणीची हत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या या प्रकरणाने अत्यंत नाजूक वळण घेतल्याने आणखी धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.