पुणे (वृत्तसंस्था) – बालेवाडी येथील मुंबई- पुणे महामार्गाशेजारी असलेल्या निकमार महाविद्यालयात ‘इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन’ केलेल्या 300 जणांपैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी दिली. हे सर्व जण शहरातील इतर ठिकाणाहून येथे क्वारंटाईन करण्यात आलेले असून, यामध्ये कुणीही स्थानिक रुग्ण नसल्याचेही त्यांनी सांगितले. tv9 मराठीने याबाबत बातमी दिली आहे.
इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन केलेल्या या नागरिकांचे अहवाल प्राप्त होऊन 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर त्यांना सिंबायोसिससह इतर ठिकाणच्या दवाखान्यात हलवण्यात आलं आहे.दरम्यान, पुण्यात प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण झाली आहे. ससून रुग्णालयात या उपचार पद्धतीला येत्या दोन तीन दिवसात सुरुवात होईल असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
तर तिकडे पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवसात तब्बल ११ जण करोना बाधित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरातील आणखीच चिंता वाढली असून एकूण आकडा हा ८० वर पोहचला आहे. यापैकी २१ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे तर तीन जणांचा आत्तापर्यंत करोना ना बळी घेतलाय.







