नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी सध्या देशभरामध्ये लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला असून त्याची मुदत येत्या ३ मे रोजी पूर्ण होत आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या नागरिकांची घर वापसी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
याबाबत योगींनी नोडल अधिकाऱ्यांना परराज्यात अडकलेल्या मजुरांची यादी तयार करण्याची सूचना केली आहे. यादी तयार झाल्यानंतर या नागरिकांना देशातील कानाकोपऱ्यातून उत्तर प्रदेशात परत आणण्याची योजना आखण्यात आलीये. परराज्यातून आणलेल्या नागरिकांमधून राज्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी या सर्वांना उत्तर प्रदेशात आणल्यानंतर सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असून यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऐन लॉक डाऊनच्या काळात राजस्थानातील कोटा येथे अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना ३०० बसेस पाठवून परत आणले होते. विद्यार्थ्यांना परत आणल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आदित्यनाथ यांच्यावर लॉक डाऊनचा फज्जा उडवल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी हालचाली देखील सुरु केल्या असून यासाठी ते ३ मेपर्यंत थांबतात की त्यापूर्वीच नागरिकांना परत आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.